;
top of page

५३ हजार घरांत उजळली ‘मोदी ज्योत

Writer: vilas joshi
vilas joshi
18 hours ago
1 min read

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव दक्षिणमध्ये दीपोत्सव; आमदार अभय पाटील यांचा उपक्रम


(Ebelagavi special)


बेळगाव :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५३ हजार घरांमध्ये एकाचवेळी दीपप्रज्वलन करण्यात आले. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अनोख्या उपक्रमामुळे गुरुवारी सायंकाळी संपूर्ण मतदारसंघ प्रकाशाने उजळून निघाला.



मतदारसंघातील विविध प्रभागांत नागरिकांनी घरांचे उंबरठे, अंगण आणि देवघरात दिवे लावून पंतप्रधान मोदी यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना केली. महिलांनी घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या. युवक आणि लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



या उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली होती. त्यांनी प्रभागनिहाय घरोघरी संपर्क साधून नागरिकांना दीपोत्सवात सहभागी करून घेतले. हजारो दिवे एकाचवेळी प्रज्वलित झाल्यामुळे अनेक परिसरांत दिवाळीसदृश वातावरण निर्माण झाले होते.



पूजा अन्‌ रुग्णांना फळवाटप

दरम्यान, शहरात भाजपतर्फे विविध सेवाभावी कार्यक्रम घेण्यात आले. खासदार जगदीश शेट्टर, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी आमदार संजय पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी गणपती मंदिरात विशेष पूजा केली.



त्यानंतर नेत्यांनी बिम्स रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना फळांचे वाटप केले. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एकाचवेळी ५३ हजार घरांत दीपप्रज्वलन झाल्याने बेळगाव दक्षिण मतदारसंघ प्रकाशमय झाला.

 
 
 

Comments


bottom of page