;
top of page

बेळगावला आयटीचा ‘बूस्ट’ दोन हजार रोजगारांची आशा; आयटी कंपनीशी चर्चा अंतिम टप्प्यात

Writer: vilas joshi
vilas joshi
14 hours ago
2 min read

आमदार अभय पाटील यांची माहिती; यल्लूर किल्ल्यावर ६० कोटींचा रोप-वे प्रस्ताव


बंद झालेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा


ई-बेळगाव

बेळगाव : शहरातील सुमारे दोन हजार युवकांना रोजगार देण्याची क्षमता असलेली आयटी कंपनी बेळगावमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित कंपनीशी चर्चा अंतिम टप्प्यात असून, हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास शहराच्या रोजगार क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी दिली.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४३ मधील गणेशोत्सव मंडळांना नगरसेविका वाणी जोशी यांच्यातर्फे देण्यात आलेल्या ‘हिंदू’ असे लिहिलेल्या कुर्त्यांचे वितरण मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.


आमदार पाटील म्हणाले, ‘‘बेळगावमधील प्रतिभावान युवकांना रोजगारासाठी बंगळूर, पुणे आणि हैदराबादला जावे लागते. त्यांना आपल्या शहरातच चांगल्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. दोन हजार जणांना रोजगार देऊ शकणाऱ्या एका कंपनीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास स्थानिक प्रतिभेचे स्थलांतर रोखण्यासही मदत होईल.’’

विमानसेवांसाठी केंद्राकडे पाठपुरावा

उद्योग आणि आयटी कंपन्यांना बेळगावकडे आकर्षित करण्यासाठी प्रमुख शहरांशी नियमित विमानसेवा असणे अत्यावश्यक आहे.

‘उडान-३’ योजनेअंतर्गत देशातील सर्वाधिक विमानमार्ग मिळालेल्या शहरांमध्ये बेळगावचा समावेश होता. मात्र, त्यानंतर काही महत्त्वाच्या मार्गांवरील सेवा बंद करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

बेळगावमधून यापूर्वी उदयपूर, जयपूर आणि चेन्नईसाठी थेट विमानसेवा सुरू होती.



उद्योजकांच्या प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचेही सहकार्य घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यल्लूर किल्ल्यावर ६० कोटींचा रोप-वे

ऐतिहासिक यल्लूर किल्ल्यावर सुमारे ६० कोटी रुपये खर्चून रोप-वे उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.


बेळगावमध्ये धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला मोठा वाव आहे. मात्र, या पर्यटनस्थळांना अपेक्षित प्रसिद्धी मिळालेली नाही. वॅक्सिन डेपो परिसरातील चार महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून, नोव्हेंबरमध्ये त्यांचे लोकार्पण करण्याचा मानस आहे. हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज हजारो पर्यटक बेळगावकडे आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



पाणी योजनेच्या विलंबावर नाराजी

शहरातील चोवीस तास पाणीपुरवठा योजना २०१३ मध्येच २४० कोटी रुपये खर्चातून सुरू होणे अपेक्षित होते. त्यावेळी अंमलबजावणी झाली असती, तर २०१६ पर्यंत काम पूर्ण झाले असते. मात्र, विलंबामुळे प्रकल्पाची किंमत ५८८ कोटी रुपयांवर पोहोचल्याबद्दल आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.


या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी अनेकदा प्रयत्न करावे लागले. दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे सहकार्यही यासाठी मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

एल अँड टी कंपनीच्या जलवाहिनीच्या कामासाठी नव्याने तयार केलेले रस्ते पुन्हा खोदले जात आहेत. रस्त्यांची कामे आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामात समन्वय नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.


वाणी जोशी आदर्श नगरसेविका


नगरसेविका वाणी जोशी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना आमदार पाटील म्हणाले, ‘‘नगरसेवकांनी कशा पद्धतीने काम करावे, याचे उत्तम उदाहरण वाणी जोशी यांनी घालून दिले आहे. त्या प्रभागातील नागरिकांच्या सातत्याने संपर्कात राहतात. त्यांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. सक्रिय नगरसेविका म्हणून त्या प्रभागाच्या विकासासाठी झटत आहेत.’’

ब्राह्मण समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष भरत देशपांडे, अरुणा नाईक, अरविंद हुनगुंद, मधू गुरव आणि शेखर इनामदार यांनीही मनोगत व्यक्त केले. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सातत्यपूर्ण प्रयत्न हाच संकल्प’

‘‘बेळगावमध्ये केवळ पायाभूत सुविधांचा विकास होऊन चालणार नाही. स्थानिक युवकांसाठी शहरातच रोजगारनिर्मिती झाली पाहिजे. आयटी पार्क, संरक्षण उत्पादन प्रकल्प आणि पर्यटन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.’’

— अभय पाटील, आमदार

 
 
 

Comments


bottom of page