;
top of page

तेलंगण भाजपच्या सहप्रभारीपदी अभय पाटील

Writer: vilas joshi
vilas joshi
1 day ago
1 min read

कुशल संघटकावर महत्त्वाची जबाबदारी; बेळगावच्या आमदाराच्या नेतृत्वाची राज्याच्या सीमेपलीकडे झेप


बेळगाव :

पक्षसंघटन, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि निवडणूक रणनीती आखण्यातील अनुभवासाठी ओळखले जाणारे बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांची तेलंगण राज्याच्या भाजप सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक पातळीवर तळागाळापासून पक्ष मजबूत करणे, युवा कार्यकर्त्यांचे संघटन करणे आणि निवडणुकीच्या काळात प्रभावी रणनीती आखण्यात अभय पाटील यांना विशेष अनुभव आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात पक्षाचा भक्कम पाया उभारण्याबरोबरच विविध समाजघटकांतील मतदारांना पक्षसंघटनेशी जोडण्यासाठी त्यांनी दाखविलेल्या कौशल्याने पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेतले आहे.



सदैव कार्यकर्त्यांमध्ये वावरणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. संघटनात्मक शिस्त आणि पक्षनिष्ठेला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. बूथस्तरीय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम आखणे आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाचा जनाधार विस्तारत नेणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.



तेलंगणमध्ये पक्षसंघटना अधिक बळकट करणे, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याची महत्त्वाची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आली आहे. कर्नाटकच्या सीमेपलीकडेही त्यांच्या संघटनात्मक अनुभवाचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा निर्णय हा अभय पाटील यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.



त्यांच्या नियुक्तीबद्दल बेळगावमधील भाजप नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. तेलंगणमध्ये पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 
 
 

Comments


bottom of page